"अपघाताने " आयुष्यात येणारे असे काही लोक..
आपल्याला नेमका काय धडा देऊन जातील . ?????
मोडला नाही कणा ...पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा
दगडांवर झोपलेल्या ह्या व्यक्तीकडे पाहून तुम्हाला काय वाटते?
की हा नक्कीच यूपी, बिहार किंवा छत्तीसगड वरून आला असणार? बरोबर ना? बिलकुल नाही !
------------------------------------------------------------------------------
हा अमरावतीच्याच जवळपासचा विदर्भातील एक पोरगा...बारावी पास विथ 70% ! पण इथे मागच्या आठवड्यात काही दिवस आमच्या साईटवर जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करत होता...कधी डंपर चालवयचा, मशनरीजची देखभाल ठेवयाचा...पुढे शिकायचे आहे त्याला. गावाला शेती आहे भरपूर..पण पाणी नाहीये ! वाळवंट झालाय पार. घरात दाणा नाही खायला त्यामुळे सध्या गाव सोडून पोटापाण्यासाठी शहरात. दोन मोठ्या बहिणी आहेत लग्नाच्या...लग्न जमत नाही. दोघी काम करतात नागपूरच्या एमआयडीसीमध्ये. हा पुण्यामध्ये. वडील आणि आई खूप वर्षे आधीच गेले. लाखो रुपयांचे कर्ज मागे ठेवून...परिस्थितीचे चटके सोसत,हाय खाऊन गेले ! - त्याने त्याची कर्मकहानी सांगितली.
------------------------------------------------------------------------------
मी म्हटलं,"बघतो मी तुला अजून कुठे चांगले काम असेल तर आणि तुला कोणी शैक्षणिक मदत करील असं ही बघतो"
तो म्हटला, "चालेल सर...ह्या आमच्या शेठ ने अजून काही पैसे नाही दिले..पुढे देईल का तेही माहीत नाही. काल ताईचा फोन आलेला. नागपूरला एका ठिकाणी नोकरी मिळत आहे. त्यामुळे चाललो आहे मी उद्या,परवा !"
"ओक्के.. मग परवा पासून कुठे मुक्काम केला होतास? शेठ कडे?"
"नाही हो सर.. शेठ अजून आला पण नाही जेवायला पैसे देतो बोलला ते पण नाही.. इथेच झोपलो दोन दिवस !"
"ह्या मुरुमावर? अरे येड्या मग मला सांगायचे ना.. वॉचमनच्या घरामध्ये तुझी राहायची व्यवस्था केली असती."
"त्यात काय उलट बरं आहे इथे मस्त हवा खात चांदण्या बघत झोप लागते की.."
"आणि हे दगड? पाठीला टोचत नाहीत का?"
" नाही सर, सवय आहे आम्हाला !"
"बर जेवायचे काय?"
"काल पर्यंत होते थोडे पैसे आज नाहीत म्हणजे आहेत पण गावाला जायला,इमर्जन्सी साठी ठेवले आहेत...रात्री जेवण करीन मी...आत्ता भूक नाही"
"अरे कशाला जीवाला मारतो.. चल जाऊ.. हॉटेल मध्ये चांगली मिळते राईसप्लेट.."
दोघेही जेवलो...नंतर दुसऱ्या दिवशी मला म्हटला- "सर मला एक हजार देता का? गावाला जायचे आहे..माझ्याकडे आहेत पण कमी पडत आहेत. तुमचा अकाऊंट नंबर द्या..तुम्हाला तुमचे पैसे पाठवुन देईन नागपूरला पोचल्यावर !"
------------------------------------------------------------------------------
बिचारा गरीब आहे..कदाचित नाही देणार हा पैसे, असं मनाशी ठरवून मी एक मदत म्हणून त्याला एक हजार दिले...
------------------------------------------------------------------------------
आज सकाळी त्याने एक हजार साठ रुपये जमा केले !
त्याला कॉल करून विचारले , " अरे मी तुला एक हजार दिले होते ना? तू साठ रुपये काय बोनस म्हणून दिलेस?".
हसत हसत बोलला," नाही हो सर..तुम्ही मला जेवू घातले होते ना? ती राईसप्लेट साठ रुपयांची होती ! ते पैसे दिले."
"अरे काय वेडा माणूस आहेस रे तू? ते पैसे द्यायची गरज काय होती?"
तुम्ही माझ्या परिस्थितीकडे पाहून माझ्या गरिबीकडे पाहून मला ती मदत केली होती. मी जर हे पैसे परत केले नसते तर तुम्हाला वाटले असते, बघा हे लोक गरीब गरीब म्हणून असे लुबाडतात,फुकटचे खातात ! तुमचा असा कुठलाच गैरसमज होऊ नये म्हणून ते पैसे परत केले ! "
-----------------------------------------------------------------------------------
अपघाताने आयुष्यात येणारे असे काही दिवस आणि असे काही लोक आपल्याला नेमका काय धडा देऊन जातील, हे कधीच सांगता येत नाही