आज ती चिमुरडी सुद्धा "स्वप्ने पाहू शकते..

सोशल मीडिया असा सुद्धा " राईट टू एज्युकेशन " चळवळीसाठी प्रभावी वापर

"ही  एक अगदी वरवर पाहता आपली देशात दिसणारी एक सामान्य घटना आहे पण सोशल मीडिया  या प्रभावी दुहेरी तलवारीचा असा काही सकारात्मक उपयोग केला गेला आहे ज्याने एका "चिमुरडीच्या "शिक्षणाचा मार्ग सोपा झाला ,,आणि या चिमुरडीचे अवघे "विश्वच "बदलून गेले .

हैदराबादची एक शाळा. शाळेत वर्ग सुरू आहे, शिक्षक शिकवण्यात मग्न आहेत. मुलं शिक्षकांना एकाग्र चित्ताने ऐकतायेत. सर्व गणवेशात बसलेत. पण, वर्गाच्या बाहेर एक मुलगी उभी आहे. निळ्या रंगाचे जुने-मळकट कपडे घातलेल्या या मुलीच्या हातात एक ‘कटोरा’ दिसतोय. शांतपणे उभं राहून ही चिमुकली वर्गाच्या आतमध्ये वाकून पाहत आहे. ती मुलगी शाळेच्या दरवाजावर नेमकं कशासाठी उभी आहे, असा प्रश्न प्रत्येकालाच पडतोय.

आता ही घटना सविस्तर जाणून घेऊया. एका सरकारी शाळेच्या बाहेर हातात वाटी घेऊन ही मुलगी केवळ मध्यान्ह भोजनातील उरलेलं अन्न खाण्याच्या अपेक्षेने उभी होती. तिचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या फोटोने अनेकांच्या हृदयाला हात घातला. एका व्यक्तीच्या तर इतका की त्याने या चिमुकलीला त्याच शाळेत प्रवेश घेऊन दिला, जेणेकरुन तिला दररोज मध्यान्ह भोजन व शिक्षण मिळावं.

हा फोटो एका तेलगु वृत्तपत्रात ‘आकाली चोपू’या मथळ्याखाली प्रसिद्ध झाला होता. याचा अर्थ, भूकेल्या नजरेने एकटक पाहणं. हैदराबादच्या देवल झाम सिंह या सरकारी शाळेतील हा फोटो असून दिव्या असं या चिमुकलीचं नाव आहे. ती या शाळेत शिकत नाही, पण दररोज शाळेत येते. शिकण्यासाठी नव्हे तर शाळेत दररोज मिळणाऱ्या मध्यान्ह भोजनातील उरलेलं अन्न आपल्याला खावयास मिळेल आणि पोट भरेल या एकाच आशेने. दिव्याचे आई-वडिल शाळेजवळीलच झोपडपट्टीत राहतात. कचरा उचलण्याचं आणि साफ-सफाईचं काम ते करतात. आई-वडिल कामासाठी गेल्यानंतर दिव्या हातात वाटी घेऊन शाळेच्या दिशेने निघते.

एक दिवस शाळेच्या आतमध्ये आशेच्या नजरेने पाहणाऱ्या दिव्याचा प्रसिध्द फोटो वेंकट रेड्डी यांनी पाहिला.मुलींच्या अधिकारासाठी लढणाऱ्या एम.व्ही. फाउंडेशन या एनजीओमध्ये ते काम करतात. रेड्डी यांनी त्या वृत्तपत्राची एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली. त्यासोबत, “ही मुलगी तिच्या हक्काचं शिक्षण घेऊ शकत नाही, तिला खायलाही मिळत नाहीये. एकीकडे देशातील प्रत्येक मुला-मुलीकडे ‘राईट टू एज्युकेशन’ असतानाही दिव्यासारख्या मुलांना वर्गाबाहेर उभं राहून आपल्या हक्काच्या गोष्टी देखील केवळ दूरवरुन पाहाव्या लागतात”, अशी पोस्ट केली. यानंतर रेड्डी यांनी एनजीओतील इतर लोकांशी संपर्क साधला आणि दिव्याला त्याच शाळेत प्रवेश मिळवून दिला. काही वेळानंतर वेंकट रेड्डी यांनी अजून एक फोटो शेअर केला. त्यात दिव्या आपल्या आई-वडिलांसह , शाळेच्या इतर शिक्षकांसोबत उभी असलेली दिसते. विशेष म्हणजे या फोटोमध्ये दिव्या शाळेच्या गणवेशात आहे.

असा हा उपयोग आपण सुद्दा करू शकतो का  ?