"लेफ्टनंट जन" सर्वोच्च पदावर उच्च स्थान मिळविणारी पहिली महिला

"लेफ्टनंट जन"  सर्वोच्च पदावर उच्च स्थान मिळविणारी पहिली महिला

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या भारतीय लष्करातील डॉक्टर असून पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेजच्या पहिल्या महिला अधिष्ठाता आहेत. लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोहचणार्‍या त्या देशातील तिसऱ्या तर राज्यातील एकमेव महिला ठरल्या आहेत. इतकेच नव्हे, तर पंतप्रधानांच्या सायन्स टेक्‍नॉलॉजी सल्लागार समितीत असणाऱ्या एकमेव डॉक्‍टर ठरल्या आहेत.

त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्गसन महाविद्यालयातून तर वैद्यकीय शिक्षण बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. एम.बी.बी.एस.च्या तिन्ही वर्षात त्या प्रथम आल्या. वैद्यकीय पदवी संपादन केल्यावर त्यांनी लखनौ येथे लष्करी प्रशिक्षण घेतले. वैद्यक शास्त्रातील अवघड अशा पेडीयाट्रीशन (शिशुरोग तज्ञ) विषयात त्यांनी एम.डी. ही पदवी घेतली. तर पीडियाट्रिक नेफ्रॉलॉजीचे प्रशिक्षण दिल्लीतील ए.आय.आय.एम.एस. येथून पूर्ण केले.

भारतीय लष्करातील त्या पहिल्या प्रशिक्षित पीडीयाट्रिक नेफ्रोलॉजिस्ट आहेत. पुणे आणि दिल्ली येथे त्यांनी मूत्रपिंडांच्या विकारांवर उपचार

करणारी केंद्रे उभारली. सिंगापूर तसेच रॉयल कॉलेज, इंग्लंड येथून त्यांनी या विषयातील विशेष प्रशिक्षण घेतले आहे.

ए.एफ.एम.सी. मध्ये सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि शिशुरोग विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच अनेक विद्यापीठात परीक्षक म्हणूनही काम केले आहे. कानिटकर यांनी विविध क्रमिक पुस्तकात १५ प्रकरणे लिहिली आहेत. तसेच त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. २०१७ मध्ये ए.एफ.एम.सी. मध्ये अधिष्ठाता म्हणून रुजू झाल्यावर तेथे वैद्यकीय संशोधन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

लष्करात डॉक्टर म्हणून सामील झालेल्या अधिकारी स्त्रियांपैकी अनेक जणी लग्नानंतर ही नोकरी सोडतात. कायम नोकरी (पर्मंनंट कमिशन) घेणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी आहे. आजही हे क्षेत्र पुरूषप्रधान क्षेत्र मानले जाते. मात्र डॉ.कानिटकर यांनी हॉस्पिटल नसलेल्या ठिकाणी तात्पुरत्या बराकीत राहून सुद्धा सैनिकांना आरोग्यसेवा दिली. आसाम, अरुणाचल प्रदेश या बरोबर दक्षिण आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी त्यांनी काम केले. डॉ. माधुरी कानिटकरांचे पती राजीव कानिटकर हे सुध्दा लेफ्टनंट जनरल आहेत. परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक विजेते आहेत. त्यांना निखिल आणि विभूती अशी दोन मुले आहेत.

डाॅ. माधुरी कानिटकर यांना १९८२ मध्ये अभ्यास आणि शिक्षणेतर क्षेत्रातील कामगिरीबद्दल राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक तसेच कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि बालकांच्या काळजीसाठी दिलेले योगदान यासाठी २०१४ साली विशिष्ट सेवा पदक व २०१८ साली अति विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आलेले आहे.

या प्रखर संघर्षाला ..सलाम आणि भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभकामना .

Post a Comment

0 Comments