देशातील पहिली शेतकरी आत्महत्या!! कोणी, केव्हा, कुठे, का व कशी झाली?


प्रिय सहकारी व मित्रांनो जसे की आपण जाणताच १९ मार्च २०२० ला "शेतकरी आत्महत्या आणि शासनाचे धोरण" या प्रासंगिक विषयाच्या संदर्भात "आत्मचिंतन आणि उपोषण हे शांती व अहिंसात्मक" मार्गाने करणार आहोत.

चला तर जाणून घेऊया!! शेतकरी आत्महत्या व १९ मार्च या तारखेची ऐतिहासिक पार्श्वभूमी

शेतकरी आत्महत्येच्या सत्राने महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. शासन व प्रशासन शेतकऱ्यांविषयी वेळकाढू धोरण आखत असून याकडे कोणाचेही लक्ष न्होते. शासन व प्रशासनास जाग आणण्याकरिता झाली होती देशातील पहिली शेतकरी आत्महत्या!!! ज्याची नोंद आहे. १९ मार्च २०२० रोजी तब्बल ३४ वर्ष या घटनेला पुर्ण होतील. ही घटना विदर्भातील असून जाणून घेऊया साहेबराव करपेंच्या सहकुटुंब आत्महत्येमागील वास्तव…

घरात श्रीमंती, गावाचे सलग ११ वर्ष सरपंच पद, उत्तम संगीत विशारद, भजनाच्या गायनाकरिता पंचकोशीत त्याचे नाव होते. साहेबराव करपे (रा. चिलगव्हाण ता. महागाव जि. यवतमाळ) यांचा मोठा वाडा आजही पाहण्या लायक आहे. घरात येणाऱ्या जाणार्यांना नेहमी मदत करण्याची भावना असलेले करपे पाटील यांच कुटुंब होते.

गावाचे कारभारी असल्याने प्रत्येक कार्यात ते पुढे राहत. परंतु शेतकर्यांना कधी अस्मानी संकट मारते तर, कधी सुलतानी संकट!! असेच काही झाले. थकीत बिलापोटी एमएसईबीने वीजजोडणी खंडित केली. ४० पैकी १५ एकरांतील पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू-चणा वाळला अन्‌ सोबतच साहेबरावांची स्वप्नेही करपलीत. कर्ज फेडण्याच्या चिंतेने ते सैरभैर होऊन खचले. पती-पत्नीने काहीतरी मनाशी ठरवले व मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडले.

करपे पाटील नेहमी वर्धेला मनोहर कुष्ट्धामला येत असे. त्याही दिवशी ते पत्नी व आपल्या चार मुला सहित मनोहर कुष्ट्धाम (दत्तपुर) इथे आले. अन् तो दिवस होता १९ मार्च १९८६. तिथे खोली घेतली, त्यानंतर हार्मोनियम आणि टाळ घेऊन बराच वेळ ते सहकुटुंब भजन गात होते. घरून सोबत आणलेल्या स्टोववर पत्नीने भजे केली. परंतु या भज्यात होते जहर जे की त्यांनी स्वतः त्यात एन्ड्रीन मिसळले होते. मुलांना भजे खायला दिले. एक-एक करीत चारही मुलांनी पाठोपाठ पत्नीनेही जगाचा निरोप घेतला.

हे झाल्यानंतर साहेबराव करपे यांनी "शेतकर्यांची हलाखीची स्थिती" एका चिठ्ठीत वर्णन करून लिहली. आपण का हा निर्णय घेत आहोत या बाबत त्यांनी सविस्तर लिहले. यामध्ये दोन मुले, दोन मुली (लहान मुलगी सात-आठ महिन्यांचीच होती) व पत्नीच्या मृत्यूचा घटनाक्रमही लिहिला. खोलीत एका रांगेत पत्नी आणि मुलांचे मृतदेह ठेवून त्यांच्या कपाळावर त्यांनी एक-एक रुपयाचे नाणे ठेवले.

आपल्या आत्महत्येमुळे इतरांना त्रास होऊ नये तसेच कोणीही या प्रकरणात अडकू नये म्हणून साहेबराव करपे यांनी दाराबाहेर दगडाला दोरीने बांधून फेकलेल्या चिठ्ठीच्या वरच्या भागातच त्यांनी कुणीही दार उघडू नये, पोलिसांना कळवावे, असे लिहून ठेवले होते. आणि शेवटी त्यांनी स्वतः ती भजे खाऊन आपली जीवनयात्रा संपवली.

आपल्या आत्महत्येने सिस्टीम आणि सिस्टम हालेल, असे साहेबरावांना वाटत होते; पण तसे काहिही घडले नाही. उलट शेतकरी आत्महत्यांच्या साखळीने महाराष्ट्र आजही ग्रासलेला आहे. साहेबराव करपे यांनी शेतकर्यांच्या समस्यांना पहिल्यांदा बोलके केले. १९ मार्च रोजी अन्नदात्यासाठी एक दिवसाचा अन्नत्याग (उपवास) अनेक लोक मागील काही वर्षांपासून ठेवत आहेत. त्यांचे पुर्ण गाव या दिवशी सुतूक पाळते.