प्रेमकुमार बोके यांचा महिला दिनानिमित्त विशेष लेख

आधुनिकता म्हणजे नक्की काय ?
    
                   स्ञी ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे हे सर्व पुरुषांनी मोठ्या मनाने कबूल करतांना कमीपणा बाळगण्याचे काही कारण नाही.कारण ज्या स्ञियांना निसर्गाने नवनिर्मितीची क्षमता प्रदान केली आहे,त्यांना श्रेष्ठ मानण्यात कोणताही पुरुषी अहंकार आडवा येऊ नये असे वाटते.प्राचीन काळापासून स्ञियांना कनिष्ठ लेखून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात येत होते.यासाठी धर्मग्रंथांचा आधार घेण्यात येत होता.सर्वच धर्मात कमीजास्त प्रमाणात हे चालत आले आहे.परंतु म.फुले व  सावित्रीबाई फुले यांच्या त्यागातून व अनेक परिवर्तनवादी महामानवांच्या संघर्षातून स्ञियांकरीता मुक्तीची दारे उघडी झाली.हळूहळू स्ञिया सर्वच क्षेत्रात प्रगती करु लागल्या.आज तर एकाही क्षेत्रात स्ञी मागे नाही.उलट अनेक क्षेत्रात ती पुरुषांपेक्षा पुढे असून उच्चस्थानी विराजमान झाली आहे.त्यामुळे सर्वांना स्ञियांच्या या प्रगतीशील वाटचालीचा अभिमानच वाटायला पाहिजे.राष्ट्रपती,प्रधानमंत्री,मुख्यमंञी,कलेक्टर,कमिश्नर,वैमानिक,साहित्यीक यासारख्या सर्वच क्षेञात तिने आपली बुध्दीमत्ता व कर्तृत्व सिध्द केले आहे.त्यामुळे भारताच्या विकासात पुरुषांच्या बरोबरीने ती सुध्दा महत्वपूर्ण योगदान देत आहे.
        एकीकडे हे सर्व घडत असतांना दुसऱ्या बाजूचे चिञ माञ फारच निराशाजनक व भयावह आहे.ज्या सावित्रीबाईंच्या अपार संघर्षामुळे आजच्या स्ञिया शिक्षित झाल्या आहेत, तिचे नाव घेण्यास सुध्दा आजच्या स्ञियांना कमीपणा वाटतो हे विदारक सत्य आहे.अनेक बुवा,बापू,अम्मा,दिदीचे फोटो अभिमानाने आपल्या घरात लावणाऱ्या उच्चविद्याविभूषीत स्ञियांच्या घरात सावित्रीबाईंना माञ जागा नाही हे पाहून मन विषन्न होते.संगणक,मोबाईल,लॕपटाॕप लिलया हाताळणारी स्ञी जेव्हा अमावस्या,पौर्णिमा,उपास तापास,नवस,कर्मकांड,मुहूर्त, नारायण नागबळी यासारख्या अवैज्ञानिक गोष्टी करण्यात धन्यता मानते तेव्हा माञ त्यांच्या बुध्दीची कीव येते.विज्ञानाच्या सर्व साधनांचा यथेच्छ उपभोग घेणारे आम्ही विज्ञानवादी दृष्टिकोन का स्विकारत नाही हा चिंतनाचा व चिंतेचा विषय आहे.साविञीने आमच्यासाठी दगडांचा मारा सहन केला.आम्ही माञ दगडाला शेंदूर फासून जेव्हा त्याचा देव करतो,तेव्हा शिक्षण घेवून आमची अवस्था दगडासारखी झाली आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.
                    आजचे बहुतांश कायदे महिलांच्या बाजूने असून महिलांवरील अन्यायाला वाचा फोडणारे आहे.त्यामुळे असंख्य महिलांना न्याय सुध्दा मिळाला आहे.बाहेरील अत्याचाराप्रमाणेच कौटुंबिक अत्याचारालाही अनेक महिला बळी पडतात.शेवटी कोर्टात गेल्याशिवाय न्याय मिळत नाही.त्यामुळे ज्यांच्यावर खरोखर अन्याय होत असेल,अशा महिलांना न्याय मिळालाच पाहिजे व त्यासाठीच सरकारने अनेक कठोर कायदे केले आहेत.परंतु अनेकदा या कायद्यांचा महिलांकडून गैरवापर सुध्दा होतांना दिसतो आहे व नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात (legal terrorism ) कायद्याचा दहशतवाद  हे कठोर शब्द वापरून या कायद्यांचा गैरवापर होत असल्याचे व हा मोठा समाजद्रोह असल्याचे निरीक्षण नोंदविले  आहे.त्यामुळे अनेकदा विनाकारण सासू,सासरे,दीर,ननंद यासारखे कुटुंबातील जवळचे नातेवाईक दोष नसतांना तुरुंगात जातात.हा महिलांकडून होणारा या कायद्याचा दुरुपयोग आहे.त्यामुळे जो दोषी असेल त्यालाच शिक्षा व्हावी.आपल्या रागाचे बळी निरपराध लोक ठरता कामा नये याची दक्षता महिलांनी घेतली पाहिजे. 
                    स्ञी आणि पुरुष ही दोन चाके आहेत.त्यांच्यामधे संवाद,सुसंवाद,प्रेम,मैञी याबरोबरच वाद,विवाद,गैरसमज, भांडणे सुध्दा होत असतात.परंतु ते टोकाला जावून कुटुंब उध्वस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.त्याचा फटका देशातील प्राचीन कुटुंब व्यवस्थेला बसून कुटुंब व्यवस्था खिळखिळी होत आहे.महिला दिनाच्या माध्यमातून या दोन्ही बाजूंवर महिलांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.आज स्ञी उच्चशिक्षित झाल्यामुळे निश्चितच तिचे आचार,विचार,धारणा,ज्ञान,जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामधे खूप बदल झालेला आहे.तिने स्वतःचे अस्तित्व सिध्द करुन दाखविले आहे.पुरुषांपेक्षा आपण जराही कमी नाही हे तिने जगाला मान्य करावयास भाग पाडले आहे.परंतु यामधूनच काही महिलांमधे मी पुरुषापेक्षा आता श्रेष्ठ आहे ही आत्मप्रौढी वाढीस लागत आहे.पुरुष सोबत नसला तरी माझे काहीच बिघडू शकत नाही ही आततायी व अहंकारी भावना काहींच्या मनात निर्माण होत असल्यामुळे दोघांमधे दरी आणि दुरी निर्माण होत आहे व त्यातूनच हसते खेळते कुटुंब कोर्टाच्या दालनात विभक्त होण्यासाठी आतुर झालेले आपण पाहतो आहे.परंतु लहानलहान मुलांचा माञ विचार होतांना दिसत नाही.त्यांचे उमललेले जीव कोमेजून जातांना आपण दररोज पाहतो,ऐकतो आहे.
                        त्यामुळे शिक्षणाचा उपयोग कुटुंब तोडण्यासाठी नाही तर, जोडण्यासाठी आहे हे दोन्ही बाजूंनी समजून घ्यावे.पती-पत्नीच्या मधे पतीचे जन्मदाते आईवडील सुध्दा नको असे विचार बाळगणे म्हणजे आधुनिकता नव्हे हे महिलांनी समजून घ्यावे.पूर्वीच्या संयुक्त कुटुंब पध्दतीत बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करुन कशाप्रकारे एकमेकांना समजून घेतले जात होते याचाही आधुनिक पिढीने अभ्यास करणे आवश्यक आहे.लग्न होताच सासू,सासरे यांच्यापासून अलग होणे म्हणजे उच्चशिक्षित होणे नव्हे हे आधी सर्वांनी लक्षात घ्यावे.तरच जीवनाचा खरा आनंद आपण उपभोगू शकतो.त्याकरीता फक्त दोन्हीकडून थोडी अॕडजस्टमेंट करण्याची तयारी असली पाहिजे.सर्व भगिनींना महिला दिनाच्या मनापासून सदिच्छा .
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
प्रेमकुमार बोके 
अंजनगाव सुर्जी 
९५२७९१२७०६
८ मार्च २०२०

Post a Comment

0 Comments